निवेदनाच्या क्षेत्रात देखील मोठी संधी : ज्योती आंबेकर

निवेदनाच्या क्षेत्रात देखील मोठी संधी  
प्रसिद्ध निवेदिका ज्योती आंबेकर यांनी दै. तरुण भारतशी केलेली बातचित
(अमर पुराणिक)
लातूरसारख्या जिल्ह्यात जन्मलेली एक साधीसुधी महिला सूत्रसंचालन, निवेदनासारख्या सामान्य क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करून दाखवते, हेच मुळात कौतुकास्पद आहे. आजपर्यंत सूत्रसंचालन किंवा निवेदनासारख्या क्षेत्रांना तसे वलय प्राप्त झालेले नव्हते, पण महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध निवेदिका ज्योती आंबेकर यांच्यामुळे निवेदनाच्या क्षेत्राला मोठे वलय प्राप्त झाले आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्तीचे ठरणार नाही.
ओघवती भाषाशैली, सूत्रबद्ध मांडणी आणि प्रभावी वाक्‌चातुर्य असे त्रिविध कौशल्य कमावलेल्या ज्योती आंबेकर  रंगकर्मी प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केलेल्या ‘भाषणकला’ शिबिरासाठी सोलापूरला आल्या होत्या, तेव्हा त्यांनी दै. तरुण भारतशी दिलखुलास संवाद साधला. ज्योती आंबेकरांनी वांद्रे-वरळी सी-लिंकचे उद्‌घाटन, राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, सोनिया गांधी आदींच्या कार्यक्रमांत सूत्रसंचालन केलेले लोकांच्या स्मरणात कायम राहिले आहे. शिवाय पत्रकार या नात्याने विधिमंडळ अधिवेशन, साहित्य सम्मेलने, नाट्य संमेलनाचे वृत्तसंकलन आणि विशेष म्हणजे पंढरपूरला पायी चालत जाऊन पंढरीच्या वारीचे देखील त्यांनी वृत्तसंकलन केलेले आहे.
यूपीएस्सीच्या स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून ज्योती आंबेकरांनी भारतीय माहिती सेवेत आपल्या बुद्धिकौशल्याच्या बळावर नोकरी मिळवली. त्या गेल्या १७ वर्षांपासून भारतीय माहितीसेवेत कार्यरत आहेत. त्या आकाशवाणी, दूरदर्शन व इतर अनेक कार्यक्रमांतून  निवेदन व सूत्रसंचालन यांच्या माध्यमातून कार्यरत आहेत. हे करता करता त्यांनी निवेदन आणि सूत्रसंचालन या क्षेत्रांत मोठे स्थान निर्माण करीत आपला वेगळा ठसा उमटवला. निवेदनाची तर ज्योती आंबेकरांना बालपणापासूनच आवड होती. शाळा-महाविद्यालयांत एनसीसी, एनएससी व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून आपली आवड जोपासायला सुरुवात केली होती, पण हा मार्ग खूप अवघड होता, असे सांगून ज्योती आंबेकर म्हणाल्या की, उमेदवारीच्या काळात हे यश मिळवायला खूप कष्ट केलेले आहेत. आजचे बहुसंख्य मोठे कलावंत हे संघर्षातूनच मोठे झालेले आहेत, असे सांगून त्या म्हणतात की, माणूस जितका मोठा होत जातो तसतसा त्यांच्या वागण्यात साधेपणा यायला लागतो, याचे उदाहरण म्हणजे गानकोकिळा लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर. ही माणसे इतकी मोठी होऊनसुद्धा त्यांच्या वागण्यात अतिशय साधेपणा व नम्रपणा आहे.
निवेदनासारख्या छोट्या समजलेल्या क्षेत्रात देखील मोठी संधी मिळू शकते, याचे उदाहरण मी स्वत:च असल्याचे ज्योती आंबेकर म्हणतात. या क्षेत्रात येऊ इच्छिणार्‍या नवोदितांना खूप मोठी संधी आहे. प्रदीर्घकाळ परिश्रम आणि अभ्यासाच्या जोरावर याही क्षेत्रात चांगले करिअर होऊ शकते. स्टुडिओ रेकॉर्डिंग आणि प्रत्यक्ष कार्यक्रम यातील फरकाबद्दल बोलताना आंबेकर यांनी यात तसा खूप फरक असल्याचे सांगितलेे. प्रत्यक्ष कार्यक्रमातून आपल्याला तत्काळ प्रतिसाद कळतो, त्यामुळे निवेदनाला हुरूप येतो. पत्रकारिता किंवा निवेदनासारख्या क्षेत्रात काम करीत असताना मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह, वकिलांपासून ते राजकीय, साहित्य क्षेत्रातील लोक पाहायला मिळतात; त्यामुळे व्यक्तिपरीक्षण आणि समाजातील सर्व पैलू जवळून पाहायला मिळतात.
ज्योती आंबेकरांच्या या यशस्वी प्रवासात त्यांचे पती अजय आंबेकर यांची  मोलाची साथ आणि पाठिंबा आहे. त्यांची कन्या जयती आंबेकर या देखील आता ज्योती आंबेकरांच्या पावलावर पाऊल ठेवत निवेदन, प्रोफेशनल अँकरिंगच्या क्षेत्रात आपली कारकीर्द सुरू केली आहे. जयती हिचे इंग्रजीवर प्रभुत्व असल्याने ती इंग्रजी कार्यक्रमांच्या अँकरिंगमध्ये चांगले यश मिळवीत असल्याचे ज्योती आंबेकर यांनी अभिमानाने सांगितले. अनेक कार्यक्रमांतून आपल्या निवेदन कौशल्याची  रसिकांंच्या मनावर छाप पाडण्यात जयती यशस्वी झाली आहे.
सोलापूरकरांबाबत बोलताना ज्योती आंबेकर म्हणाल्या की, सोलापूरकर खूप मनस्वी आणि कष्टाळू आहेत. सोलापूरने अनेक मोठे कलावंत दिले असल्याचे सांगून आंबेकर म्हणतात की, अतुल कुलकर्णी, प्रा. दीपक देशपांडे अशी अनेक नावे सांगता येतील; ज्यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, साहित्यिक आणि राजकीय क्षेत्रांत मोलाचे योगदान दिले आहे.
अशा या अष्टपैलू निवेदिका ज्योती आंबेकर यांचा आज दि. १८ ऑगस्ट रोजी वाढदिवस आहे. ‘तरुण भारत’ परिवार, वाचक आणि समस्त सोलापूरकरांच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Edit

Posted by - Admin,
on - Tuesday, January 31, 2012,
Filed under - ,
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
Loading navigation...

Post a Comment

Post a Comment