तंतुवाद्यांचा बादशहा चिंटूसिंग
•यांची बोटं तंतूवाद्यांना भावना व्यक्त करायला लावतात
•अमर पुराणिक•
चिंटूसिंग यांनी वयाच्या केवळ १८ व्या वर्षी आपल्या बोटातील संगीताच्या जादूने ९० च्या दशकातील तरुणांना भूरळ घातली आणि पाहता पाहता चिंटूसिंग हे संगीतप्रेमी तरुणांच्या गळ्यातील ताईत बनले. चिंटूसिंग यांचे गिटार वाजवणे ऐकणार्यांच्या कानांना अचंबित करतेे. त्यांच्या बोटातील जादू, तारांवरुन पळणारी चपळ बोटं, स्वरांची सच्चाइ, स्वरांवरील पकड आणि देवी सरस्वतीचा असलेला कृपाशिर्वाद यामुळे चिंटूसिंग यांनी आपल्या वादनाने संगीतप्रेमींना खीळवून ठेवले आहे. चिंटूसिंग हेे गिटार वादक, रबाब वादक, तुंबुर वादक, संगीत संयोजक, गायक, संगीतकार असे अष्टपैलू व्यक्तीमत्त्व आहे. तंतुवाद्यांवर चिंटूसिंग यांची पकड मजबूत आहे. गीटर म्हणजे चिंटूसिंग यांचा जीव की प्राण. पाश्चिमात्य वादनातील त्यांचे प्राविण्य वाखाणण्याजोगे आहे. पाश्चिमात्य शैली बरोबरच चिंटूसिंग यांनी हिंदूस्थानी शास्त्रिय संगीतात देखील तेवढेच प्रविण्य मिळवले आहे. किंबहूना हिंदूस्थानी पद्धतीने वद्यवादनाकडे त्यांचा जास्त कल आहे. रबाब देखील अतिशय कौशल्यपुर्ण वाजवतात. किंबहूना चिंटूसिंग हे भारतातील एकमेव सोलो रबाबवादक आहेत. याशिवाय तुंबुर नावाचे अफगाणी/इराणी वाद्यवादनासाठी देखील चिंटूसिंग प्रसिद्ध आहेत.
चिंटूसिंग यांनी वयाच्या १० व्या वर्षापासून संगीताचे धडे आपले पिता एनएफडीसी, पंजाबी व हिंदी चित्रपट, दुरदर्शन मालिकांचे प्रसिद्ध संगीतकार मोहिंदरसिंग यांच्याकडून घेण्यास सुरुवात केली. प्रथम चिंटूसिंग यांनी व्हायोलिन वादनाचे शिक्षण घेतले. व्हायोलिन वादनानंतर मेंडोलिन व गीटार वादनाचे शिक्षण घेतले. तेव्हापासूनच चिंटूसिंगनी स्वतंत्रवादनास प्रारंभ केला. ज्याला मोठी उपलब्धी म्हणावी अशी गोष्ट म्हणजे १९९४ साली चिंटूसिंगला ज्येष्ठ संगीतकार पंचमदा अर्थात आर.डी. बर्मन यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली ‘१९४२ ए लव्ह स्टोरी’ या चित्रपटासाठी गीटार वादनाची मिळालेली संधी. पंचमदांनी भारतातील उत्तमोत्तम अशा २० गिटारवादकांमधून चिंटूसिंग यांची निवड केली होती, पंचमदा चिंटूच्या गिटारवादनाने खूप प्रभावीत झाले होते, आणि चिंटूसिंगनी पंचमदांनी दिलेल्या त्या संधीचे केलेले सोने हे चिंटूसिंग यांच्या यशाचा पाया म्हणायला हरकत नाही. या दशकातील तरुण पिढीचे आवडते चित्रपट आणि त्यातील गाणी जसे बचना ए हसिनो, ओमकारा, ओम शांती ओम, सध्याचे लोकप्रिय गाणे ‘अल्ला के बंदे’ आदी अनेक चित्रपटांच्या गाण्यांना चिंटूच्या गिटारनेच साजशृंगार चढवला आहे. चित्रपट संगीताबरोबरच चिंटूसिंगनी सॅटरडे सस्पेन्स, कभी कभी ऍन्ड जासूस, एक दिन, एक जीवन अशा अनेक टीव्ही मालिकांना संगीत दिले आहे.
शास्त्रिय, उपशास्त्रिय, वेस्टर्न, वेस्टर्न क्लासिकल या प्रकारांच्या सोलोवादनाप्रमाणेच चिंटूसिंगनी साथसंगतीसाठी आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. जगजितसिंग, हरिहरन, मेहदी हसन, पं. अजय पोहनकर, पं. विश्वमोहन भट्ट आदी दिग्गजांना चिंटूसिंगनी तितकीच दमदार साथसंगत केली आहे. चिंटूसिंग या दिग्गज कलावंतांच्या गळ्यातील ताईत आहेत. तसेच आर.डी. बर्मन, ए.आर. रहमान, प्रसिद्ध ड्रम व तालवाद्यवादक शिवमणी या भारतीय संगीतकारांप्रमाणेच फिल कॉलिन्स, डिजे डेव्ह, बॉब फ्रॉम न्यू ऑर्लिन्स आदी अनेक आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या कलावंत व ग्रुप्ससोबत गीटार वाजवण्याची संधी चिंटूसिंग यांना मिळाली ती चिंटूसिंग यांच्या क्षमतेच्या जोरावरच. चिंटूसिंग यांनी अनेक अल्बम काढले आहेत त्यापैकी अनेक लोकप्रिय झाले आहेत. सर्वप्रथम ‘इन सर्च’ हा अल्बम तर ९० च्या दशकात तरुणांमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरल्याचे वर सांगितलेच आहे. त्यानंतर ‘फ्रॉम माय हार्ट स्ट्रिंग्ज’, ‘अरेबियन नाईटस’, ‘अर्बन ग्रुव्ह’ असे अनेक हिंदी, पंजाबी व इन्स्ट्रुमेंटल अल्बम प्रकाशित झाले आहेत आणि ते रसिक कानसेनांत लोकप्रिय ठरले आहेत.
गीटार, रबाब, तुंबुर वादनामुळे चिंटूसिंग लोकप्रिय झालेले असले तरीही तेवढ्यावर न थांबता चिंटूसिंग यांचा सतत नव्याचा शोध सुरुच राहिला आहे. शास्त्रीय संगीताचा वापर वेगवेगळ्यापद्धतीने करण्याचा चिंटूसिंग यांचा प्रयत्न सतत सुरु असतो. प्रत्येक गाण्यात नाविण्य आणण्याचा आणि वेगळ काहीतरी रसिकांना देण्याचा प्रयत्न सुरु असतो. त्यामुळेच यापुढेही आपल्याला चिंटूसिंग नावाच्या या गुणी कलावंताकडून नवनवे ऐकण्याची संधी मिळणार आहे.

on - Saturday, March 31, 2012,
Filed under - Blog , सांस्कृतिक : अमर पुराणिक
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
Post a Comment
Post a Comment